विकसित भारताच्या स्वप्नामध्ये महाराष्ट्राचे योगदान

देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन, मंत्रालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण

मुंबई – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे. आज भारताच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य अतिशय वेगाने पुढे जात आहे. विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्र विशेष योगदान देत आहे. देशाची ही विकासगाथा यापुढे थांबणार नाही. प्रधानमंत्री यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे, हा नारा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याकरिता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताच्या सेनेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व आतंकवाद्यांचे तळ उद्वस्त केले. त्यातून भारतावरील होणारे हल्ले परतवून लावले. यामुळे जगालादेखील नवीन भारत काय आहे, हे या ऑपरेशन सिंदूरमुळे समजले आहे. म्हणून ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या-ज्या सेनेच्या अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी सहभाग घेतला त्यांचंही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आज भारताची विकासगाथा कोणीही थांबवू शकत नाही. विविध क्षेत्रांमध्ये भारत प्रगती करतो आहे. अंतराळ क्षेत्रातही भारताने ठोस पाऊल ठेवले आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याकरिता जगातले जे उत्पादन आहे, ज्या व्यवस्था आहेत, त्या सगळ्या भारतामध्ये गुणवत्तापूर्ण तयार कराव्या लागतील. स्टार्टअप्स, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी भारतामध्ये तेवढ्याच समर्थपणे उभ्या कराव्या लागतील. त्या दिशेने भारताची वाटचाल सुरु आहे. प्रधानमंत्र्यांनी स्वदेशीचे आवाहन केले आहे. जिथे जिथे शक्य असेल, त्या त्या ठिकाणी स्वदेशीचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी देण्याचे कार्य करायचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. भारतामध्ये थेट परदेशी गुंतवणूक येते, त्यापैकी चाळीस टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आहे. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती राज्यामध्ये होत आहे. वस्तुनिर्माण, आयात-निर्यात, स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ही एक मोठी विकासाची घोडदौड सुरू आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकरता मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळाली पाहिजे, याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जगातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्यूटेड सोलरचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हा प्रकल्प २०२६ च्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे शेतकऱ्यांना १२ तास दिवसाची वीज मिळेल. त्यावेळी १०० टक्के हरित वीज देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.