केंद्राकडून एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला मिळाले तब्बल इतके हजार कोटी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार, सर्व राज्यांना मिळाली मोठी मदत

मुंबई – केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण १० ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त आहे. या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीने आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसेच आपल्या कल्याणकारी व विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्यात यंदा महापुराची स्थिती असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या प्रकारे निधी गोळा केला जात आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. पण केंद्राकडून मिळालेल्या निधीतून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना काही मदत होणार का हे पाहावं लागणार आहे.

सरकारने राज्य सरकारांना कर हस्तांतरणाचा ₹१,०१,६०३ कोटींचा आगाऊ हप्ता जारी केला आहे. हे १० ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या सामान्य मासिक हस्तांतरणापेक्षा जास्त आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की हे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. यामुळे राज्यांच्या भांडवली खर्चाला गती मिळेल आणि त्यांच्या विकास आणि कल्याणकारी खर्चांना वित्तपुरवठा करण्यास मदत होईल.