
महाराष्ट्रात सर्वाधिक व्यवहार डिजिटलमधून, पहा देशाची आकडेवारी, महाराष्ट्र देशात अव्वल

मुंबई – युपीआय व्यवहारांमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागला आहे. महाराष्ट्राने डिजिटल पेमेन्टमध्ये सुद्धा आपले वर्चस्व प्रस्थापित करत इतर राज्यांच्या तुलनेत डबल आकडेवारीसह पहिल्या क्रमांकावर आपले स्थान पटकावले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. देशातील जवळजवळ 90 टक्के व्यवहार हे UPI चा वापर करून केले जातात. नुकत्याच राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यातर्फे जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तब्बल १३.१९ पॉइंटने महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला असून कर्नाटक ७.७७ पॉईंटसह दुसऱ्या तर उत्तर प्रदेश ७.५० पॉईंटसह तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात २,११,४३३.६२ कोटी रुपयांचे व्यवहार जून २०२५ मध्ये झाले असून, दुसऱ्या क्रमांकांवरील कर्नाटक राज्याच्याही तुलनेत महाराष्ट्रात ५६.७९ टक्के अधिक व्यवहार झाले आहेत. देशात युपीआय वापरता महाराष्ट्र ८.८० %, कर्नाटक ५.६१ %, उत्तर प्रदेश ५.१५, तेलंगणा ४.९४ %, तामिळनाडू ४.३७ %, राजस्थान २.९१ %, मध्य प्रदेश २.१७ % असे प्रमाण राहिले आहे. त्यातही
फोन पे वरुन, ११,९९,६९०,गुगल पे वरुन ८,४०,९३१, पेटीएम १,३४,१७१, नवी २१,८१४, सुपरमनी ७,७१६, क्रेड ५१,३८४ इतके व्यवहार यावरून करण्यात आले आहेत. या व्यवहारात किराणा खरेदी करताना जास्त वापर करण्यात आला आहे, तर हाॅटेलसाठीचा खर्च दुस-या क्रमांकावर आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 23 टक्क्यांनी वाढल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नुसार, युपीआयच्या माध्यमातून मे-जून महिन्यात 18.68 अब्ज व्यवहार झाले असून त्यांची एकूण किंमत 25 लाख कोटींहून अधिक आहे. युपीआयमुळे भारताची आर्थिक व्यवस्था वेगाने कॅशलेस आणि डिजिटल होत आहे.
यूपीआय व्यवहारांसाठी फोन पे, गुगल पे आणि पेटीएमचा सर्वाधिक वापर केला जात आहे. यूपीआय व्यवहारांसाठी सरकारी बँकांचा वापर केला जात असला तरी ॲपवरून व्यवहार करण्यासाठी खासगी बँकांची ॲप अग्रेसर आहेत.









