
हवामान विभागाकडून रेड आणि आॅरेंज अलर्ट जारी, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती, महाराष्ट्राला पावसाने झोडपले

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. एकाएक वातावरणातील बदलामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी मध्यम ते दमदार पावसाच्या सरींने हजेरी लावली आहे. त्यातच आता काळजी वाढवणारा अलर्ट देण्यात आला आहे.

मागील आठ दिवसापासून महाराष्ट्राला पावसाने झोडपलं आहे, पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात देखील पावसानं दमदार हजेरी लावली आहे. जालन्यात मुसळधार पाऊस झाला, दुसरीकडे बारामती आणि सोलापुरातील करमाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील ४ तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, नवी मुंबई शहर व रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट, ठाणे व पालघरला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर केला आहे. या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. राज्यात मान्सून दाखल झाला आहे. यंदा राज्यात पावसाचं प्रमाण कसं असणार याबाबत आधीच हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला होता. यंदा देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदा देशात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण १०७ टक्क्यांच्या आसपास राहू शकते अशी शक्यता आहे. सरकारनेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या अवकाळी पावसाने बीडमधील पर्यटनस्थळ असणाऱ्या कपिलधारा धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहू लागला. दरम्यान, मुसळधार पावसाने बीड आणि संभाजीनगर या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. तर मुंबईत चार मीअर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे.









