
प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास, महाकुंभमेळ्यात स्नान करताना आला हृदयविकाराचा झटका

प्रयागराज – प्रयागराजमध्ये आजपासून कुंभमेळा सुरु झाला आहे. सामान्य नागरिकाबरोबेच नेतेमंडळीही कुंभमेळ्यासाठी दाखल झाली आहेत. पण कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेलेले सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकारच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. कुंभमेळ्यात असताना महेश कोठे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी पार पडल्या आहेत. तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षात महेश कोठे यांचा प्रवास राहिला. महेश कोठे हे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर होते. कोठे यांनी राजकारणाची सुरूवात काँग्रेसमधून केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणुक लढवली, पण ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर महेश कोठे शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सोलापूर उत्तर मतदारसंघातून महेश कोठे हे विजय देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते.मृतदेह प्रयागराजवरून सोलापुरला आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचा अकाली मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. महेश कोठे हे ५५ वर्षांचे होते. महेश कोठेंचा मृतदेह प्रयागराज येथून सोलापुरात विमानाने आणण्यात येणार आहे. महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे भाजपाचे विद्यमान आमदार आहेत.

महेश कोठे यांचे सोलापूर शहराच्या राजकारणात मोठे प्रबल्य होते. सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी पार पडल्या आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त शहरात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोठे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.









