लग्नाचे आमिष ,अत्याचार करून जातीवाचक शिवीगाळ; तरुणावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

तुझ्यासोबत मी लग्न करतो असे सांगून महिलेवर वारंवार अत्याचार केले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तिला जातीवाचक शिवागाळ करुन मारहाण केली. तसेच मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार सन २०१९ ते जून २०२४ या कालावधीत काळेपडळ, बोराडे नगर परिसरात घडला आहे. याबाबत ४० वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रामेश्वर यशवंत आयनुले याच्याविरुद्ध आयपीसी ३७६, ३७६/२/एन, ५०६ सह सह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेसोबत ओळख करुन तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. पीडितेने लग्नाबाबत तगादा लावला असता आरोपी रामेश्वर याने जातीवाचक शिवीगाळ करुन लग्न करण्यास नकार दिला. तसेच तिला धमकावले. आरोपीच्या भीतीने व सततच्या भांडणामुळे महिलेने अनेकवेळा घर बदलले. मात्र, आरोपी महिलेचा शोध घेऊन त्याठिकाणी येऊन तिला मारहाण करत होता. आरोपीने महिलेच्या घरी येऊन तिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.