महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त

सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलेंडरचे दर घसरले, महागाईच्या काळात दिलासा, नवीन किंमत काय?

मुंबई – जूनच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात करण्यात आली आहे. इंडियन ऑइलने शनिवारी रात्रीच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती २४ रुपयांनी कमी केली आहे. पण घरगुती गॅस मात्र अगोदरच्या किमतीत मिळणार आहे.

रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर व्यवसायांसारख्या व्यावसायिक क्षेत्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती तेल कंपन्यांनी कमी केल्या आहेत. हा बदल १ जून २०२५ पासून लागू होईल. या कपातीमुळे त्यांच्या दैनंदिन कामांसाठी एलपीजीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आर्थिक राजधानी मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडर १६७४.५० रुपयांना मिळणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत याही महिन्यात स्थिर राहिली आहे. २ महिन्यापूर्वी म्हणजे एप्रिल महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढवण्यात आली मात्र त्यानंतर किमतीत कोणताच बदल झालेला नाही. विशेष म्हणजे या तीन महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर ८० रुपयांनी कमी झाले आहेत. याआधी ८ एप्रिल रोजी सिलिंडरच्या दरात बदल झाले होते. काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ झालेली नाही. १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलिंडर मागील महिन्यातील दरावरच मिळत आहे. दिल्लीत ८०३ रुपये, कोलकात्यात ८२९रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये तर चेन्नई ८१८.५० रुपये या दरांत घरगुती गॅस मिळत आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपातीसह, तेल विपणन कंपन्यांनी एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या किमतीतही कपात करण्यात आली आहे.

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस दरांचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती, रुपयाची स्थिती आणि अन्य बाजार परिस्थितीच्या आधारावर किंमतीत घट किंवा वाढ केली जाते. मे महिन्यातही व्यावसायिक गॅसच्या दरात कपात झाली होती. सलग तीन महिन्यांत गॅसच्या दरात कपात झाली आहे. याचा फायदा हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य व्यावसायिक कारणांसाठी गॅस घेणाऱ्या विक्रेत्यांना होणार आहे.