बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न, या वारकऱ्याला मिळाला पूजेचा मान

पंढरपूर – लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा पार पडत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी राज्यासाठी फडणवीस यांनी विठ्ठलाकडे साकडे घातले आहे.

आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक केली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील कैलास दामु उगले, कल्पना कैलास उगले या दांपत्याला विठ्ठलाच्या महापुजेचा मान मिळाला. राज्यामधील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या सुख समृद्धीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी पूजा केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरीता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या सोबत तर वारकरी आलेच परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली, असे त्यांनी सांगितले. विठूरायाच्या पूजेमध्ये देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा देखील सहभागी होती. यावेळी विठ्ठल मंदिर समितीने गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा शाल घालून सन्मान केला. यावेळी त्यांनी आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.

सध्या लाखो भाविक पंढरपूरामध्ये दाखल आहेत. चंद्रभागा नदीच्या काठी भाविकांची मोठी गर्दी आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासाने कमी झाला आहे.