
स्वारगेट येथे २०१३ मध्ये झालेल्या कुणाल शंकर पोळ याचा खून करणार्या आरोपींचा खून करण्याचा प्रयत्नात असलेल्या एन्जॉय ग्रुपच्या ८ आरोपींविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी पाठविलेल्या मोक्का प्रस्तावास अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी मंजुरी दिली आहे.

अमित म्हस्कु अवचरे ऊर्फ औचरे (वय २७), सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६), लतिकेश गौतम पोळ (वय २२), शुभम ऊर्फ मेंटर अनिल जगताप (वय २७), ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४), अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), बसर्या ऊर्फ बसवराज स्वामी (वय २६) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादी हे २९ ऑगस्ट रोजी सासवडहून पुण्यात येत असताना कोलवडीकडे जात होते. त्यावेळी जुन्या वादातून आरोपींनी फिर्यादी यांच्यावर हल्ला करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. लोणीकंद पोलिसांनी आरोपींना अटक केली. ते अशाच प्रकारे संघटितपणे वारंवार गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले.

लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडु, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे सादर केला. मनोज पाटील यांनी त्याची छाननी करुन आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) याला मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तपास करीत आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडु, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी ही कामगिरी केली आहे.









