
निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, या महिन्यात होणार मतदान, या मशीनशिवाय होणार यंदाची निवडणूक

नाशिक – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी यंदा दिवाळीनंतर, म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होणार असल्याची महत्त्वाची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिली. यावेळी त्यांनी एक महत्वाची घोषणाही केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत खूप मोठी बातमी समोर येत आहे. या निवडणुका एकत्र होणार नाहीत, अशी माहिती आता समोर येत आहेत. तसेत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही, असे संकेत राज्य निवडणूक आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संसस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. कारण सर्व निवडणुका एकत्रित करण्यासाठी तेवढं मनुष्यबळ राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. SC-ST आरक्षण निश्चित असते, परंतु OBC आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार असल्याचेही वाघामारे यांनी यावेळी स्पष्ट केले. मागील निवडणुकांमध्येही OBC आरक्षण होते आणि यावेळीही तेच तत्त्व पाळले जाणार असल्याचेही वाघामारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत माहिती देताना सांगितले. १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे निवडणूक घेण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यावर पुढील प्रक्रिया राबवली जाईल. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक यंत्रणा यांचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आला.
राज्य निवडणूक आयोगाने ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या बाबतीत मात्र पूर्वीप्रमाणेच २२७ प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हे २३६ प्रभागांपर्यंत वाढवले गेले होते, मात्र महायुती सरकार आल्यावर पुन्हा २२७ प्रभाग रचना करण्यात आली.









