
प्लॉट विक्रीची आकर्षक जाहिरात प्रसिद्ध करुन एका दाम्पत्याची ११ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार ऑगस्ट २०१० ते जून २०२४ या कालावधीत पुण्यातील अतुलनगर येथे घडला आहे. आरोपी महिलांनी मावळ तालुक्यातील मोरवे गावातील भुखंड देण्याचे आमिष तक्रारदार यांना दाखवले.याबाबत अजय रंजीत दयाल यांनी बुधवारी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनिषा वसंत वाकडे, दिपा वसंत वाकडे यांच्यावर आयपीसी ४२०,४१९ ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मावळ तालुक्यातील मौजे मोरवे येथील जमिनीवर कात्यायानीज उपवन या नावाने फार्म हाऊस करता प्लॉट विक्री करण्याचा प्रकल्प सुरु केला. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून पुणे व शहर परिसरात आकर्षक जाहिरात प्रसिद्ध केली. ही जाहिरात पाहून फिर्य़ादी यांनी ऑगस्ट २०१० मध्ये या प्रकल्पातील फेज दोन मधील एक चौरस मीटरचा भुखंड खरेदी करण्याची तयारी दाखवली. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन प्लॉट विक्री करण्याच्या बहाण्याने ११ लाख ६५ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी अद्यापपर्यंत प्लॉट नावावर करुन न देता तसेच घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.









