
दोन दिवसात जमा झाले एवढे कोटी रुपये, सरकारचा माफीसाठी दबाव, कामरा म्हणाला मी फक्त अजित पवार…

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका केल्याने स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. कुणाल कामराच्या विरोधात मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण लोकांचा मात्र कामराला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

कुणाल कामराला देशविदेशातून पाठिंबा मिळत आहे. एकीकडे सरकारकडून कुणाल कामरावर माफीसाठी दबाव टाकला जात आहे. याचवेळी कुणालच्या कायदेशीर लढ्यासाठी जगभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला असून दोन दिवसांत त्याच्या खात्यात तब्बल चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. कुणालचा कायदेशीर लढा बळकट करण्यासाठी जगभरातील चाहत्यांकडून आर्थिक मदत केली जात आहे. या मदतीच्या रूपात दोन दिवसांत कुणालच्या खात्यात तब्बल ४ कोटी ७ लाख ८० हजार रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. स्टँड-अप शो दरम्यान, विनोदी कलाकार कामराने ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका लोकप्रिय हिंदी गाण्याचे विडंबन केले, ज्यामध्ये शिंदे यांना गद्दार म्हटले गेले. त्यांनी महाराष्ट्रातील पक्षविभाजनाचा उल्लेख करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची खिल्ली उडवली होती. या वादग्रस्त टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी रविवारी मुंबईतील खार परिसरातील हॉटेल युनिकॉन्टिनेंटलची तोडफोड केली होती. दरम्यान कामराने मुंबई पोलिसांशी संपर्क साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंबद्दल जे म्हटले होते तेच मी म्हटले होते. असे म्हणत माफी मागण्यास नकार दिला आहे तसेच या प्रकरणात पोलिसांना तपासात मदत करण्याते आश्वासन दिले आहे.
या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते, कार्यकर्ते यांनी आक्रमक भूमिका घेत कुणाल कामरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात कुणाल कामरा याने माफी मागावी, त्याच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सभागृहात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.









