पुणे प्रतिनिधी – रोहित पवार | संशयित वाहनाचा पाठलाग करताना पोलिसांना कोयता दाखवल्याची घटना मुंढवा भागात घडली. दरम्यान पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून तपासणी केली असता १ हजार १४० लिटर हातभट्टीची गावठी दारू असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दोघांत अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विलास बाबासाहेब चव्हाण (४१, रा. काळेपडळ, हडपसर), बापू अशोक जाधव (रा. लोणकर वस्ती, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मुंढवा पोलिसांच्या वतीने झेड कॉर्नर परिसरात पेट्रोलिंग करण्यात येत होते. यावेळी महिंद्रा पिकअप वेगात गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याना संशय आला. पोलिसांनी खासगी वाहनाने पाठलाग केला असता पिकअपच्या चालकाने लोखंडी कोयता दाखवून गाडी अडवायची नाही असा इशारा केला. तेव्हा आरोपीना पोलिस असल्याचे सांगताच ते लोखंडी हत्यार जागेवर टाकून पळून जात होते. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला अडविले. यानंतर पोलिसांनी वाहन तपासले असता पिकअप मधील निळ्या ड्रम मध्ये हातभट्टीची गावठी दारू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी २ लाखांचे पिकअप, ३८ कॅन मध्ये असलेली १ लाख २५ हजार ४०० रुपयांची गावठी दारू, कोयता असा ३ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे