मुंबई – अल्पवयीन मुलावर धार्मिक शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करणाऱ्या १५ वर्षीय मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. कांदिवली येथील १३ वर्षाच्या मुलावर धार्मिक शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार पीडित मुलावर दोनवेळा अत्याचार झाला आहे. याप्रकरणी १५ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दुसऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये कोणाचा सहभाग होता, याबाबत अद्याप माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी पोक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार पीडित मुलगा एका धार्मिक शिक्षण संस्थेत शिकत होता. त्याच्याबरोबर शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलाने यावर्षी २६ मे ला त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.
याशिवाय तक्रारीनुसार, पीडित मुलावर २१ ऑगस्टलाही लैंगिक अत्याचार झाला होता. पण तो कोणी केला, याबाबत माहिती नसल्यामुळे अनोळखी व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी १५ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.