पुणे शहरात सर्वत्र मतदान सुरु असताना पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. अशातच तीन चार मुलांनी एका तरुणाचे हातपाय बांधून अपहरण केल्याची तक्रार येते.अगोदरच अर्लट असलेली पोलीस यंत्रणा आणखी सजग होते. अपहरण झालेल्या तरुणाचा शोध घेतला असता तो एका झाडाखाली चक्क डबा खात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर खरा प्रकार समोर आला.
याप्रकरणी एका ६१ वर्षाच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते घरी असताना त्यांच्या ४३ वर्षाच्या मुलाच्या मोबाईलवरुन फिर्यादीचा मोठा मुलगा याला त्याच्या मोबाईलवर फोन आला. त्याला तीन चार अनोळखी मुलांनी पकडून त्याचे हात पाय बांधून घेऊन निघाले आहेत, असे कळविले असून या लोकांनी मुलाचे अपहरण केल्याचे सांगितले. या तक्रारीची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाला सुरुवात केली. मुलाच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्यात आले. ते लोहगाव परिसरात निघाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी व त्यांच्या सहकार्यांचे पथक लोहगाव परिसरात शोध घेऊ लागले.
तेथील एका झाडाखाली हा तरुण चक्क एकटाच डबा खात बसल्याचे दिसून आले. डबा खाता खाता तो जंगली रम्मी खेळत होता. हे सर्व पाहून पोलिसांना उलगडा झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.हा ४३ वर्षाचा तरुण बी जे शिर्के कंपनीत अँगल कटिंगचे काम करतो. त्याला काही महिन्यांपासून जंगली रम्मी खेळण्याचा नाद लागला आहे. त्यासाठी त्याने मित्र, नातेवाईकांकडून थोडे थोडे करीत साडेतीन लाख रुपये उसने घेतले. आता हे लोक पैसे परत मागण्यासाठी घरी येऊ लागले. त्यातून वाद सुरु झाले. तेव्हा त्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने अपहरण झाल्याचा बनाव रचला व मोठ्या भावाला फोन केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करीत आहेत.