गणेश विसर्जनदिवशी पुण्यातून ८ महिन्याच्या बाळाचे अपहरण ; तब्बल १२ दिवसांनी सुखरुप सापडले अहमदाबादला

गणेश विसर्जन सुरु असताना पुणे रेल्वे स्थानकातून ८ महिन्याच्या बालकाचे अपहरण केले जाते. पोलीस जंग जंग पछाडतात, त्यानंतर तब्बल १२ दिवसांनी हा मुलगा अहमदाबाद येथील उनावा मध्ये सुखरुप सापडला आहे. पोलिसांनी त्याचे अपहरण करणार्‍या दोघांना अटक केली आहे.मोहम्मद खान कुरेशी (वय २७), नजमा अक्रम खान कुरेशी (वय २५) अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत.

पुजा संतोष दास (वय २८) व तिचा मित्र हे पुणे रेल्वे स्टेशनवर थांबले होते. नजमा व मोहम्मद खान कुरेशी यांनी त्यांचा विश्वास संपादन करुन भुलथापा देऊन पुजा हिचा ८ महिन्याचा मुलगा याला आपल्याकडे घेतले. गर्दीचा गैरफायदा घेऊन ते पळून गेले. १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. गणेश विसर्जन सुरु असताना प्रचंड गर्दी असल्याने त्यातून आरोपींची ओळख पटविणे मुश्किल होते. घटनेची तीव्रता व गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसांनी तीन पोलीस पथके तयार केली.

लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा संमातर तपास सुरु केला होता.आरोपींनी गुन्हा करताना परिधान केलेले कपडे, वापरण्यात आलेले तांत्रिक साधने, तांत्रिक माहितीचे विश्लेषण, गुप्त बातमीदारांची माहिती तसेच इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलाला पळविल्यानंतर ते स्वारगेटला आले. तेथून ते अहमदाबाद येथे गेल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार अहमदाबाद येथे शोध घेत असता उनावा येथे दोघे जण असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथकाने २९ सप्टेबर रोजी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बालकाची तब्बल १२ दिवसांनी सुखरुप सुटका केली. आरोपींना मुलबाळ नसल्याने त्यांनी मुलाचे अपहरण केल्याचे चौकशीत त्यांनी सांगितले.