
पुणे – पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली झाली आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे नवे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

जितेंद्र डूडी कनिष्ठ अधिकारी असल्याने पद अवनत करून त्यांच्याकडे पुणे जिल्हाधिकारी पदाचा भार सोपवण्यात आला आहे. दिवसे यांच्याजागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना पदभार देण्यात आला आहे. तर, साताऱ्याच्या जिल्हाधिकारीपदी पुण्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशान्वये राज्यातील १० आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काहींना पदोन्नती प्रमोशन देण्यात आले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांना पदोन्नती देण्यात आली असून भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यापूर्वी सन २०१९ मध्ये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा, नंदूरबार, सन २०१९ ते २०२० या कालावधीत सहायक जिल्हाधिकारी मंचर तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव, पुणे तर सांगली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे.

जितेंद्र डुडी हे २०१६ च्या बॅचचे सनदी अधिकारी (आयएएस) आहेत. ते मूळचे राजस्थानचे आहेत. त्यांची सुरुवातीला झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिव म्हणूनही काम केले आहे. २०१८ मध्ये त्यांची महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.









