
मुंबई – राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते अस्वस्थ असून महायुतीकडे त्यांचा ओढा वाढला आहे. महायुतीमध्ये आत्तापर्यंत ४२ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. त्यात एक मंत्रीपदाची जागा रिक्त असल्याने अनेक चर्चा होत आहेत.

कायद्यानुसार महाराष्ट्रात ४३ मंत्रीपदांची तरतूद आहे. असं असूनही एक मंत्रीपद रिक्त ठेवल्याने आता विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील एक मोठा नेता लवकरच महायुतीत येणार अशी चर्चा सुरु झाली आहे, ते नेते म्हणजे जयंत पाटील असल्याचेही चर्चा होत आहे. अमोल मिटकरी यांनी राखीव मंत्रिपद हे जयंत पाटील यांच्यासाठी ठेवल्याचा दावा केला होता. त्याला कारणही तसेच आहे, कारण जयंत पाटील हे अधिवेशन काळात आपल्या पक्षापासूनच अंतर राखत असल्याचे दिसत आहे. कारण महाविकास आघाडीच्या एकाही आंदोलनात ते सहभागी झाले नाहीत. त्यामुळे जयंत पाटील महायुतीत सहभागी होणार अशी चर्चा होत आहे. महत्वाचे म्हणजे २०२३ साली अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतरही एक मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले होते. तेंव्हाही ते पद जयंत पाटील यांच्यासाठीच रिक्त ठेवल्याची चर्चा होती. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात आले नाही. यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. सांगली जिल्ह्याचे मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठीच राखून ठेवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लवकरच जयंत पाटील महायुतीत प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. पण ते अजित पवार गटात प्रवेश करणार की भाजपात प्रवेश करणार, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. जयंत पाटीलही अधिवेशनात सहभागी झाले आहेत. मात्र महाविकास आघाडीपासून ते अलिप्त आहेत. त्यांच्या या भूमिकेबद्दल वेगवेगळ्या चर्चा असल्या तरी जानेवारी महिन्यात पाटील योग्य निर्णय घेतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.









