जळगाव येथील दादावाडीजवळील राष्ट्रीय महामार्गावर गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या दरम्यान महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या पुलावर घडली आहे.सुदैवाने चालकाच्या समयसूचकेमुळे ॲम्बुलन्समधील एक गरोदर महिला, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या दादावाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. रुग्णवाहिका एरंडोल शासकीय रुग्णालयातून गरोदर महिला व तिच्या कुटुंबीयांना जळगाव जिल्हा रुग्णालयात घेऊन जात होती. दरम्यान, चालक राहुल बाविस्कर यांनी आपल्या वाहनाच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे दिसले आणि तो ताबडतोब खाली उतरला आणि त्यांने प्रवाशांनाही खाली उतरवले. तसेच आजूबाजूच्या लोकांना वाहनापासून दूर राहण्याचा इशारा दिला. रुग्णवाहिकेला लागलेली आग काही मिनिटांतच ऑक्सिजन टाकीपर्यंत पसरली आणि मोठा स्फोट झाला. क्षणातच वाहनाच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. आगीच्या ज्वाला आणि सिलिंडर दीडशे फूट उंचापर्यंत उडाले. फुटलेले सिलिंडर रस्त्याच्या दुस-या कडेला तर रिकामे असलेले सिलिंडर वाहनाजवळ पडले. सुदैवाने, गरोदर महिला आणि तिचे कुटुंब थोडक्यात बचावले आहेत.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत रुग्णवाहिकेला आग लागल्याचे दिसत आहे. मात्र, काही क्षणांतच रुग्णवाहिकेचा स्फोट झाला आहे. हे पाहिल्यानंतर आजूबाजुला उपस्थित असलेले लोक घाबरून पळून जात असलेले दिसून येत आहे.