“मी पद्मसिंह पाटील अन् राणांना गार करून आलोय,तू किस झाड की पत्ती है”…ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना थेट इशारा

दोन दिवसांपूर्वी ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात शिवसेनेच्या मेळाव्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरून ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांचा जोरदार समाचार घेतलाय.

तानाजी सावंत यांनी म्हटले होते की, सगळ्या सहकारी संस्थाची याने अन् याच्या बापाने वाट लावली. तेरणा बंद पाडला व अन् भंगार विकलं. खापर राणा दादांच्या वडिलांवर फोडलं , तुला लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही जिवाचं राण केलं, या सावंत सरांनी तुझ्यासाठी या शेतकऱ्यांची कष्टाची साखर गोडावूनला होती ती 60 लाख क्विंटल विकली, अशा एकेरी उल्लेख करत तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला होता.

यावरून ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांना इशारा दिलाय. ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे की, मी ४० वर्षे मंत्री राहिलेल्या डॉ.पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है, अशा शब्दांत ओमराजे निंबाळकर यांनी सावंत यांचे नाव न घेता सावंतांना इशारा दिलाय. आता यावर तानाजी सावंत यांच्याकडून काय प्रत्युत्तर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यानिमित्त सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सुरु आहे. या प्रचारात राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले. या मतदारसंघातून महाविका आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूने भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या निवडणूक लढवत आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट देण्यात आलं आहे. धाराशिव लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.