‘तुझ्या भिशीमुळेच मी कर्जबाजारी झालो’

बार्शी – सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या भिशीमुळे कर्जबाजारी झालो असे म्हणत शिक्षक पतीने पत्नीची हत्या केली. एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने स्वत:च्या मुलावरही प्राणघातक हल्ला केला. या हत्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मनिषा अनंत साळुंखे असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. तर अनंत रामचंद्र साळुंखे असे आरोपी पतीचे नाव आहे. तसेच तेजस अनंत साळुंखे असे त्यांच्या जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुझ्या भिशी लावण्यामुळेच मी कर्जबाजारी झालो आहे, असं म्हणत खासगी शिकवणी घेणाऱ्या पतीने पत्नीला आणि मुलाला गाडीवर बसवून शेतात नेले. शेतात नेल्यानंतर पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळला आणि चाकू, दगडाने मारहाण करून हत्या केली. यानंतर त्याने स्वत:च्या मुलावरही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. दरम्यान अनंत साळुंखे यास अटक करण्यात आली होती.शनिवारी त्यास बार्शी न्यायालयात उभे केले असता त्यास २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अनंत हे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवणी घेत, तर त्यांची पत्नी घरात शिवणकाम करीत होती. त्यामधून येणाऱ्या उत्पन्नावर प्रपंच चालत असे. नागोबाचीवाडी गाव शिवारात त्यांची २४ गुंठे शेती आहे. मृत मनीषा हिने दोन-तीन ठिकाणी भिशी लावलेल्या होत्या. मात्र, भिशीतील काही लोक पैसे घेऊन पळून गेल्याने त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली होती. तसेच घराचे हप्ते थकले होते. त्यामुळे अनंत याने आर्थिक विवंचतेतून हे कृत्य केले, असण्याची शक्यता आहे.