
पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले असतानाही गुंड त्या आदेशाला न जुमानता खुशाल शहरात फिरत असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी एकाच दिवशी तडीपार केलेल्या दोघा गुंडांना कोयता घेऊन फिरताना पकडले.

अर्जुन ज्ञानदेव मडके (वय २३) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. अर्जुन मडके याला पिंपरी चिंचवड, पुणे शहर व जिल्ह्यातून १७ जून २०२४ रोजी एक वर्षासाठी तडीपार केले आहे. असे असताना तो कोणतीही परवानगी न घेता बावधन येथील नॅचरल आईस्क्रीम येथे आला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला जाऊन पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळून आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले तपास करीत आहेत.

अमर राघु टेमघरे (वय २३) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. अमर टेमघरे याला २१ जून २०२४ रोजी एक वर्षासाठी पिंपरी चिंचवड, पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. असे असताना तो बापुजीबुवा मंदिर येथे थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन खात्री केली असता पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. तेव्हा त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी काही अंतरावर त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळून आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले तपास करीत आहेत.









