आरोपीऐवजी पीडितांवर गुन्हा दाखल करणे हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार
मुंबई – पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार तरुणींनी केली होती. त्यांच्या तक्रारीची साधी दखलही पोलिसांनी घेतली नाही. १२ तासांहून अधिक काळ पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करूनही दोषी पोलिसांवर गुन्हा नोंद केला नाही. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींऐवजी पीडितांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप पुणे पोलिसांनी केला आहे. हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
१ ऑगस्ट रोजी कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करणा-या पोलिसांवर तात्काळ ॲट्रॅासिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला पाहिजे होता पण पोलिसांनी त्यांची साधी तक्रारही घेतली नाही. म्हणून या पीडित मुलींनी पोलीस आयुक्तांलयात दाद मागितली पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तिथेच ठिय्या आंदोलन केले. पण पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, उलट या प्रकरणी गुन्हा दाखल करता येणार नाही असे पत्र देऊन पीडितांना पाठवून दिले. याप्रकरणी पुणे पोलिसांविरोधात जनमानसातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करत आहेत, आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत, हे पुण्यात पोलिसांचे जंगलराज आल्याचे निदर्शक आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम १३२ अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत असताना, पोलीस तपासात इंडोअर परिसरात कोणतीही घटना घडली नसल्याचे जाहीर करण्यात आले.
वैद्यकीय अहवालात कोणत्याही जखमा दिसून न आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्वेता पाटील आणि इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खासदार रोहित पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली व सुजात आंबेडकर आंदोलना दरम्यान उपस्थित असले तरी त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.