पुणे प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत राष्ट्रवादी शरद पवाराच्या गटाच्या आमदार पुत्रासोबत धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील शिरुरचे आमदार अशोक पवार यांचे पुत्र ऋषीराज पवार याचं अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऋषीराजचे विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. याप्रकरणी ऋषिराज पवार यांनी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणेही गाठले. तर विधीज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकाराचा व्हिडीओ माध्यमांसमोर दाखवत माहिती दिली. या सर्व प्रकारावर आमदार अशोक पवार यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. अशोक पवारांनी मुलासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत निषेध व्यक्त केला आहे.
अशोक पवार म्हणाले, आज दुर्दैवी घटना घडली, घृणास्पद म्हणजे विरोधी माणसं कुठल्या थरापर्यंत जातात. आज माझ्या मुलाला मोटारसायकलवर असताना एकाने प्रचार करण्यासाठी जवळच्या वस्तीत नेलं, तिथं गेल्यावर त्याला कोंडलं. त्याचा गळा पट्टीनं की फडक्यानं आवळण्यात आला. त्याला सांगितलं तू कपडे काढ, एका महिलेला विवस्त्र करुन अत्यंत घृणास्पद प्रकार केला.
पवार पुढे म्हणाले, ‘या घटनेनंतर काही लोकं भेटायला आले. ते म्हणाले, बापू त्या पोरांना माफ करा. पण अरे काय चाललंय, हा प्रकार काय आहे. खरं म्हणजे आमच्या सारख्याचं मन एकदम बेचैन झाले आहे. लोकशाहीत निवडणूक लोकशाही पद्धतीनं तुम्ही लढा, असे घृणास्पद प्रकार करुन आमच्या कुटुंबाला वेठीस धरायचं आहे का, अत्यंत निंदनीय ही गोष्ट आहे. म्हणजे काळ यांना माफ करणार नाही.’