यावर्षी दहिहंडीत दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ, असे मिळणार विमा संरक्षण

मुंबई – दहीहंडीमध्ये मानवी मनोरे रचण्याच्या पारंपरिक प्रथेस साहसी खेळाचा दर्जा शासनाने दिला आहे. गोविंदाचा वाढता प्रतिसाद विचारात घेवून सन २०२५ मधील दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने क्रीडा विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

दहीहंडी या खेळाला साहसी दर्जा दिल्यापासून दहीहंडीच्या या खेळामध्ये अनेक गोविंदांचा सहभाग वाढला आहे व त्याच बरोबर खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा धोकाही वाढलेला आहे. त्यासाठी मागील दोन वर्षापासून ७५ हजार गोविंदांसाठी विमा कवच देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.यंदा यात वाढ करुन दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळावे अशी मागणी मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याला भरणे यांनी उत्तर दिले. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना क्रीडामंत्री मंत्री भरणे म्हणाले, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गोविंदामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याकरिता अंदाजे १ कोटी २५ लाख एवढा निधी राज्य क्रीडा विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल. सन २०२३ व २०२४ मध्ये प्रत्येकी ७५ हजार गोविंदांना ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत विमासंरक्षण देण्यात आले होते. यावर्षी गोविंदांच्या संख्येत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. यामुळे याकरिता अंदाजे एक कोटी २५ लाख एवढा निधी राज्य क्रीडा विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे एका गोविंदाला दुर्दैवाने मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, अपघातग्रस्त असेल तर ५ लाख, अडीच लाख किंवा किरकोळ जखमी असेल तर एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.

दहीहंडीमध्ये मनोरे रचताना तरुणांनी आपली व इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहनही क्रीडा मंत्री भरणे यांनी यावेळी केले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गोविंदामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.