
राज्य सरकारचा अपात्र बहिणींना मोठा इशारा, होणार ही कारवाई, पैसे जाणार आणि…
मुंबई – राज्य सरकारची लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता लवकरच महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे. पण त्याआधी नवीन निकषामुळे अनेक बहिणी अपात्र होणार आहेत. त्यातच सरकारने लाडक्या बहिणींना मोठा इशारा दिला आहे.

महिला व बालकल्याण विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना स्वतः हून नावे कमी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. अपात्र असलेल्या महिलांना योजनेतून नाव कमी करावे किंवा महिला व बालकल्याण विभागाच्या लेखाशिर्षावर पैसे भरावेत, अशी सूचना महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे धुळ्यातील आणि पुण्यातील दोन महिलांनी पुढे येत अर्ज स्वतः हून बाद केले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत महिला पात्र नसतील तर त्यांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या महिला पात्र नाहीत तरीही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना पैसे परत करावे लागणार आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेत लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत काम करत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे निकषांबाहेर जाऊन जर तुम्ही योजनेाचा लाभ घेत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. असे सरकारने सांगितले आहे. दरम्यान डिसेंबरमध्ये हप्ता मिळाल्यानंतर महिलांना अपेक्षा होती की संक्रांतीच्या निमित्ताने जानेवारीचा हप्ता मिळेल. पण अद्याप त्यावर सरकारकडून कोणतेही स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत.

आतापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहा हप्त्यांचे एकूण ९००० रुपये मिळालेले आहेत. तर एप्रिलपासून महिलांना दर महिना २१०० रूपये मिळणार आहेत.









