भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज घेणार पत्नीपासून घटस्फोट?

अनेक वर्षापासूनच्या नात्याला तडा, या कारणामुळे होणार घटस्फोट, अरुण जेटलींमुळे झाले होते लग्न

दिल्ली – सध्या खराब प्रदर्शनाबरोबरच भारतीय क्रिकेट संघाला लागलेलं घटस्फोटाचे ‘ग्रहण’ काही संपण्याचं नाव घेत नाही. हार्दिक पांड्या पासून सुरु झालेले घडस्फोटाचे लोन आता विरेंद्र सेहवागच्याही आयुष्यात आले आहे. कारण माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग देखील पत्नीपासून घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त आले आहे.

वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत २० वर्षांच्या संसारानंतर वेगळे होत आहेत. कुटुंबातील जवळच्या सदस्याने सांगितल्यानुसार, दोघेही अनेक महिन्यांपासून वेगळे राहतायेत. २००४ मध्ये प्रेमविवाह केलेल्या या जोडप्याने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यामुळे दोघांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये सेहवागने सोशल मीडियावर आपल्या मुलांसह आणि आईसह फोटो शेअर केले होते. पण आरती कुठेही दिसली नव्हती किंवा पोस्टमध्ये तिचा उल्लेखही नव्हता. दोन आठवड्यांपूर्वी, सेहवागने पलक्कडमधील विश्व नागयाक्षी मंदिराला भेट दिली आणि तेथील फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. तथापि, या पोस्टमध्येही आरतीचा कोणताही संदर्भ नव्हता. त्यामुळे दोघेही विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. सेहवाग आणि आरती यांना आर्यवीर आणि वेदांत अशी दोन मुले आहेत. आर्यवीरचा जन्म २००७ मध्ये झाला, तर वेदांतचा जन्म २०१० मध्ये झाला आहे. दरम्यान सेहवाग आणि आरती १७ वर्षे एकमेकांचे मित्र होते, त्यानंतर २००२ मध्ये सेहवागने मस्करीत आरतीला प्रपोज केले. एवढेच नाही तर आरतीने सेहवागच्या प्रस्तावाला लगेच हो म्हटले. त्यानंतर २००४ मध्ये सेहवाग आणि आरती यांनी एकमेकांशी लग्न केले होते. आरती अहलावत ही दिल्लीतील प्रसिद्ध वकील सूरज सिंह अहलावत यांची मुलगी आहे. दिवगंत मंत्री अरुण जेटली यांनी पुढाकार घेऊन सेहवाग आणि आरतीचे लग्न जमवले होते.

वीरेंद्र सेहवागने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, आयपीएल सारख्या अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसला होता. त्यांनी नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीच्या डोपिंग विरोधी अपील पॅनेलचे सदस्य म्हणून काम केले आहे. त्याची समालोचनाची स्टाईल अनेकांना आवडली होती.