देशात लॉकडाउन लागू होणार का?; केंद्र सरकारने केली ‘ही’ घोषणा

मध्य पूर्वेतील संकटामुळे जागतिकतेल संकट निर्माण झाले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी वाढत्या तेलाच्या किमतींविषयी ट्विटरवर माहिती दिली. त्यांनी, ‘गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून, त्या प्रति बॅरल अंदाजे ७० डॉलरवरून अंदाजे १२२ डॉलरपर्यंत वाढल्या आहेत.’असे म्हटले.

पुरी यांनी पुढे बोलताना, वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे जगभरातील ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. आग्नेय आशियाई देशांमध्ये किमती अंदाजे ३०%-५०% नी, उत्तर अमेरिकेत ३०% नी, युरोपमध्ये २०% नी आणि आफ्रिकन देशांमध्ये ५०% नी वाढल्या आहेत.हरदीप पुरी यांनी स्पष्ट केले की, मोदी सरकारकडे दोन पर्याय होते: एकतर इतर सर्व देशांप्रमाणे भारतीय नागरिकांसाठी किमती मोठ्या प्रमाणात वाढवणे किंवा आंतरराष्ट्रीय अस्थिरतेपासून भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आर्थिक भार उचलणे. त्यांनी पुढे सांगितले की, रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून गेल्या चार वर्षांपासून आपल्या सरकारने दिलेल्या वचनपूर्तीसाठी, पंतप्रधानांनी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याकरिता पुन्हा एकदा आर्थिक भार उचलण्याचा निर्णय घेतला आहे.हरदीप पुरी पुढे म्हणाले की, जागतिक परिस्थिती अनिश्चित आहे आणि आम्ही ऊर्जा, पुरवठा साखळी आणि जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहील याची खात्री करत आहे. आम्ही कोणत्याही संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, “भारताने भूतकाळात जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपली लवचिकता सिद्ध केली आहे आणि यापुढेही वेळेवर, सक्रिय आणि समन्वित कारवाई करत राहील. लॉकडाउनबद्दल पसरवल्या जात असलेल्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, शासकीय स्तरावर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. अशा वेळी आपण सर्वांनी शांत, जबाबदार आणि एकजूट राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत अफवा पसरवणे आणि विनाकारण भीती निर्माण करणे हे बेजबाबदारपणाचे आणि हानिकारक आहे.”