
भाजपाची ताकत वाढणार, महाराष्ट्रातील हे खासदार निवृत्त होणार, राजकारण तापणार?

दिल्ली – सध्या संपूर्ण देशाचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागून आहे. बिहारमध्ये यंदा कोण बाजी मारणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पण त्याआधीच इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. तर भाजपाची ताकत मात्र वाढणार आहे. त्यामुळे दिल्लीतील समीकरण बदलणार आहे.

पुढील वर्षी राज्यसभेतून तब्बल ७५ खासदार निवृत्त होणार आहेत. काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महाराष्ट्रातून सात सदस्य पुढील वर्षी निवृत्त होणार आहेत. दुसरीकडे पुढील वर्षी राज्यसभेतून काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते निवृत्त होणार असल्याने या नेत्यांना पुन्हा एकदा निवडून आणण्यात काँग्रेसला मोठी अडचण निर्माण होणार आहे. सध्या कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणामध्ये काँग्रेसची सरकार आहे. त्यामुळे कमी जागांवर अधिक दावेदार असल्याने काँग्रेस कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रातील एकूण ७ सदस्यांचा २ एप्रिलला कार्यकाळ संपत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचाही समावेश आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, भाजपचे खासदार धैर्यशील पाटील आणि शरद पवारांच्या पक्षाच्या खासदार फौजिया खान याही एकाच दिवशी निवृत्त होत आहेत. भाजपाची अनेक राज्यात सत्ता असल्याने भाजपाची राज्यसभेतील ताकत वाढणार आहे. त्यामुळे कोणतेही विधेयक संमत करण्यासाठीची होणारी दमछाक थांबणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, सामाजिक कार्यकर्ता सी. सदानंदन मास्टर आणि इतिहासकार मीनाक्षी जैन यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचा अप्रत्यक्षपणे भाजपालाच लाभ होणार आहे.









