नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीद्वारे दोषसिद्धी वाढवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, पोलीस दलाच्या बैठकीत घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

सांगली – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी कामगिरी करावी. त्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून दोषसिद्धी वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. पोलीस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निर्दोष सुटण्यामागच्या कारणांचा अभ्यास करून त्यातील त्रृटी दूर कराव्यात. आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पोलीस ठाण्यांचा आढावा घ्यावा. यातील त्रृटी दूर कराव्यात. त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी. ई समन्सची नियमित प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे वेळ व पैसा वाचतो. जिल्ह्यामध्ये सर्व उपाय करून दोष सिद्धीचे प्रमाण वाढले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत केलेला माल परत करण्यात यावा, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना औद्योगिक क्षेत्रातील बंद रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण करून तपासणी करावी. यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित पोलीस ठाण्यांना सूचित करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण वाढवावे. गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण वाढवावे, असे सूचित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवीन फौजदारी कायद्यांच्या माध्यमातून दोषारोपपत्र दाखल होण्याची गती वाढवावी. 60 ते 90 दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण वाढवावे. आरोपीच्या गैरहजेरीमध्येही खटले चालवावेत. नवीन फौजदारी कायद्यामुळे पुरावे स्वीकारार्हतेची कक्षा वाढल्याने त्याचा फायदा घ्यावा. झिरो एफआयआरचे नियमित एफआयआरमध्ये रूपांतरण करावे, असे ते म्हणाले. निवडणूकीदरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चांगली कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी 117 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूरमधील 2019 च्या महापुराचा धोका लक्षात ठेवून त्याप्रमाणे आवश्यक उपाययोजना कराव्यात. लोकांमध्ये जनजागृती करावी, असे त्यांनी सूचित केले.