महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून प्रचारही जोमात सुरू आहे. अनेक नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मात्र, पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्याच दोन गटांत राडा झाल्याचे समोर आले आहे. यावेळी कोयते, तलवारी आणि बंदुकीनं एकमेकांना धमकावण्याचा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारादरम्यान संगमवाडी इथं दोन गट समोरासमोर आले. संगमवाडी गावठाण इथं सिद्धार्थ शोरोळे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही सभा संपल्यानंतर शिरोळे हे संगमवाडी येथील भाजपाचे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. त्यावेळी साधारण साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.
याची घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी संगमवाडी इथं पोहोचले. संबंधित लोकांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येण्यास सांगितले. मात्र, या कार्यकर्त्यांनी आपसात बैठक होऊन हा वाद आपसात मिटवून घेतला. पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. संगमवाडी गावात सध्या शांतता आहे, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली.