
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर मधील चाकण चौकात वाहतूक नियमनाचे काम करत असताना पोलिसांना धमकी देत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रतिक बाळासाहेब आढाव व दादा अंकुश चव्हाण या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा पुण्यात कायद्याचे रक्षण करणारे पोलीसच सुरक्षित नसल्याने सर्वसामान्य नागरिकाचे काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

याबाबत मिळालेली माहिती नुसार शिक्रापूर येथील चाकण चौकात रात्री अकराच्या सुमारास पोलीस हावलदार श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक शिवाजी चीतारे, रोहिदास पारखे, विकास मोरे हे वाहतूक नियमांचे काम करत होते.यावेळी एम एच १२ एम एम ८१०० या बुलेट दुचाकीहून एक युवक सायलेन्सर मधून कर्कश आवाज काढत आला. पोलिसांनी त्याला थांबवत नाव विचारून चौकशी केली असता, पोलिसांना अरेरावी करु लागल्याने पोलीस त्याला पोलीस स्टेशन येथे घेऊन जात असताना दादा चव्हाण हा युवक तेथे आला त्याने पोलिसांना दमदाटी करत माझी बुलेट आहे, तुम्ही घेऊन जायची नाही, प्रतिक माझा मित्र आहे त्याला कोणी हात लावला तर त्याला चौकात गोळ्या घालीन अशी धमकी देत पोलिसांशी हुज्जत घालत पोलीस शिपाई विकास मोरे यांची कॉलर पकडली, त्यांच्या हाताला दुखापत केली, यावेळी पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये फोन करुन पोलीस शिपाई प्रताप कांबळे व स्वप्नील गांडेकर यांना बोलावून घेत त्यांच्या दुचाकीसह दोघांना ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस शिपाई विकास बाबासाहेब मोरे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने प्रतिक बाळासाहेब आढाव व दादा अंकुश चव्हाण या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे .या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.









