पुण्यात धारदार कोयता गळ्याला लावून लुटमार करणाऱ्या आरोपीला अटक..

धारदार कोयता गळ्याला लावून तरुणाला लुटून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना सोमवारी दि.२४ रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोशी येथील पलाश सोसायटीच्या समोर घडली.

ऋषिकेश युवराज बनसोडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी साकेत चंद्रशेखर भिमनळे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर आयपीसी ३९२, ४२७, ५०४, ५०६ सह आर्म ॲक्ट , महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बनसोडे याने त्याच्या हातातील धारदार कोयता फिर्यादी साकेत यांच्या गळ्याला लावून त्यांच्या खिशातून हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेला टेम्पो व इतर पाच वाहनांच्या काचांवर कोयता मारुन तोडफोड केली. आरोपीने कोयता हातात घेऊन सार्वजनिक रोडवर मोठमोठ्याने आरडाओरडा करत हातातील कोयता हवेत फिरवून दहशत पसरवली. फिर्यादी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करत आहेत.