पुण्यात भररस्त्यात मोठ्या भावाने छोट्या भावाला केली बांबुने मारहाण ; पुतण्यांनी केली लाथाबुक्क्यांनी मारहाण, नेमकं प्रकरण काय ?

मुळशी तालुक्यातील वडिलोपार्जित जमीन विकून आलेल्या पैशांच्या वाटणीवरुन मोठ्या भावाने छोट्या भावाला भररस्त्यात बांबुने मारहाण करुन जखमी केले़ पुतण्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याबाबत ज्ञानेश्वर लक्ष्मण दिघे (वय ४६ यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रामदास लक्ष्मण दिघे (वय ५१), लिला रामदास दिघे, शरद रामदास दिघे व मनोज रामदास दिघे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कर्वेनगरमधील केयुर इलेक्ट्रॉनिक्सच्या समोर, वडाचा स्टॉप येथे गुरुवारी रात्री आठ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चालक म्हणून काम करतात. मुळशी तालुक्यातील भांबर्डे गावात वडिलोपार्जित जमीन होती. त्याच्या विक्रीचा व्यवहार फिर्यादी यांनी केला होता. त्यातून आलेल्या पैशांची दोन्ही भावांना समान वाटणी करायची आहे.फिर्यादी हे १७ ऑक्टोंबरला रात्री ८ वाजता घरी असताना त्याचा पुतण्या शरद दिघे याने फोन करुन वडाचा बसस्टॉप येथे बोलविले. ते गेले असताना तेथे त्यांचा मोठा भाऊ रामदास, वहिनी लिला, पुतण्या शरद उभे होते. तेव्हा शरद याने आमच्या वाट्याचे पैसे कधी देणार असे विचारले.

त्यावर फिर्यादी यांनी मी ते पैसे आईवडिलांच्या औषधोपचारासाठी खर्च केले आहेत. माझ्याकडे जसे पैसे येतील, तसे मी तुम्हाला देईल, असे सांगितले. त्यावर शरद याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचा लहान भाऊ मनोज हा पळत तेथे आला व त्याने मारहाण केली. शरद व मनोज याने रस्त्याच्या कडेला पडलेला लाकडी बांबु उचलून फिर्यादीच्या डोक्यात, डोळ्यावर, पाठीवर, पायावर मारल्याने ते रस्त्यात पडले. त्यांनी फिर्यादीचा मुलगा सोहमलाही मारहाण केली. फिर्यादीची पत्नी, मुलगी अनिशा यांनी येऊन त्यांना सोडविले. तेव्हा चौघे फिर्यादीजवळ आले. आमचे पैसे नाही दिले तर आम्ही कोणालाही सोडणार नाही़ सर्वांना मारुन टाकू अशी धमकी देऊन ते निघून गेले. पोलीस हवालदार गांगुर्डे तपास करीत आहेत.