लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली. बारामती जी फक्त पवारांच्या नावाने ओळखली जाते. त्याच पवारांच्याच घरातील निवडणुकीत एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले. नणंद-भावजयीतील ही लढत. ज्यात नणंद भावजयीच्या वरचढ ठरली आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना पराभूत केलं आहे. राष्ट्रवादी पक्षात फुटीनंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक. शरद पवार आणि अजित पवार, एकाच घरातील दोन सदस्यांमध्ये झालेली ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या. या लढतीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली आहे.
दरम्यान जेव्हा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तेव्हा सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांबाबत बोलताना भावुक झाल्या होत्या. माझी लढाई ही कोणत्याही व्यक्तीविरोधात नाहीये, मी कोणावरही व्यक्तीगत टीका केलेली नाहीये. माझी लढाई ही बेरोजगारी, दडपशाही विरोधात असणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.. मोठ्या भावाची बायको ही आई समान असते आणि त्यांनी आमच्या आईला निवडणुकीत उतरवलं, आईला निवडणुकीच्या रिंगणात उतरून त्यांना निवडणूक लढवावी लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार यांच्यासोबत भावनिकरित्या जोडलेले आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे. प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता. नणंद-भावजय, मुलगी-सून, राष्ट्रवादीचे दोन गट तसंच महाआघाडी आणि महायुती अशी ही लढत. त्यामुळे या लढतीकडे फक्त राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं.