पुण्यात परवाना नसताना बेकायदेशीरपणे हुक्का, बिअर, दारुच्या बाटल्याची खुलेआम विक्री ; ११ हजार ४९५ रुपयांचा माल जप्त

हुक्का पिण्यास बंदी आहे़ आणि परवान्याशिवाय बिअर, दारुची विक्री करता येत नाही. परंतु, दरीपुलाजवळील हॉटेलमध्ये कोणत्याही परवान्याशिवाय दारु, बियर मिळते इतकेच काय हुक्काही खुले आममपणे ओढला जात असल्याचे दिसून आले. भारती विद्यापीठ पोलिसांनी ७ मिराकल हॉटेलवर कारवाई केली आहे.

पोलीस अंमलदार निलेश विलास खैरमोडे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी यश पांडुरंग पवार (वय २५) आणि सिद्धार्थ बाळासाहेब कामेरीकर (वय २७,) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस हवालदार देशमुख, महांगरे, पोलीस अंमलदार शेडगे, सरपाले हे अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग करत ते ७ मिराकल हॉटेलचे बाहेरील बाजुला आले. त्यावेळी त्यांना हॉटेलमधून हुक्का सदृश्य मालाचा वास येऊ लागला. त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन पाहिले तर एका रुममधील हुक्क्याचा वास येत होता.

त्यांनी आत जाऊन पाहिले तर रुममध्ये एक जण हुक्का पित बसला होता. टेबलावर अनेक फ्लेवर्स, हुक्का पॉट ठेवले होते. टेबलाच्या बाजूला बियर व दारुच्या बाटल्या ठेवल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांनी तेथील तरुणाला विचारल्यावर त्याने आपले नाव सिद्धार्थ कामेरीकर असे सांगितले.कोणताही परवाना नसताना हुक्का, बिअर, दारुच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर्स, बियर बाटल्या, रॉयल चॉलेंज दारुच्या बाटल्या असा ११ हजार ४९५ रुपयांचा माल जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करीत आहेत.