पुणे शहरात अवैध धंदे सुरूच ? नंदू नाईकच्या अड्यावर पोलिसांचा छापा ; २ लाखांचा ऐवज जप्त

पुण्यातील मटका किंग नंदू नाईक याच्या शिवाजी रोडवरील जनसेवा बिल्डिंगमधील अड्यावर छापा टाकून ८ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साधनांसह २ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांनी अनेकदा छापे घातल्यानंतरही काही दिवसांनी नंदू नाईकचे हे मटका अड्डे पुन्हा सुरु असल्याचे दिसून येते. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस हवालदार त्रिंबक बामगुडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष लक्ष्मण गुजर (वय ५२), रवींद्र धोंडिबा गजदाणे (वय ४२), गोविंद अनंतराव वेदपाठक (वय ४३), राजू बबनराव गोरे (वय ३२), किसन दत्तात्रय तावरे (वय ४३), रोहन किसन तावरे (वय १९), निलेश कृष्णाजी रणपिसे (वय ५२), नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार नाईक हा मटका किंग म्हणून ओळखला जातो. त्याचे शहरात अनेक ठिकाणी मटक्याचे अड्डे सुरु असतात. शुक्रवार पेठेतील जनसेवा भोजनालयाचे मागील जागेत मटका अड्डा सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट १ व युनिट २ च्या अधिकार्‍यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने येथे छापा घातला. तेव्हा तेथे कल्याण ओपन मटका जुगाराच्या चिठ्ठया दिल्या जात होत्या. त्यांच्याकडून मोबाईल, ९५ हजार ७४० रुपये रोख, जुगाराची साधने असा २ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम तपास करीत आहेत.