
आशिया कपचे वेळापत्रक जाहीर, या महिन्यात स्पर्धा, आॅपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान पहिल्यांदा भिडणार

मुंबई – आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC)आज एक मोठी घोषणा केली आहे. आशिया कप २०२५ हा आता युनायटेड अरब अमिरात मध्ये खेळवला जाईल. ही स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २८ सप्टेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी शनिवारी, २६ जुलै रोजी सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या. नक्वी यांनी लिहिलं की ही स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे आणि ती ९ सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. भारताकडे २०२५ च्या आशिया कपचे यजमानपद आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. २०२३ चा आशिया कप पाकिस्तानने आयोजित केला होता. परंतु, भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिल्यानंतर, ती स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली होती. त्यावेळी भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले गेले होते. यंदाच्या आशिया कप स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार आहेत. यात यजमान भारत आणि श्रीलंकाव्यतिरिक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, युएई, हाँगकाँग आणि ओमान या देशांचा समावेश आहे. दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना १४ सप्टेंबरला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आशिया कपची सुरुवात १९८४ मध्ये झाली. आतापर्यंत ही स्पर्धा १६ वेळा खेळली गेली आहे. यामध्ये भारताने सर्वाधिक, म्हणजेच ८ वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. श्रीलंकेने ६ वेळा, तर पाकिस्तानने २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.









