शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘मागील वेळी तू वाचला होता, आता जिथे दिसशील तेथे बंदुकीच्या गोळ्या घालीन,’ अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांना वाळू माफियाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत कोळी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. शरद कोळी हे सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे उपनेते आहेत.
चार दिवसापूर्वी शरद कोळी यांनी भीमा नदी पात्रातील अवैध वाळू तस्करी करणारे ट्रक पकडून दिले होते. त्यामुळे कुप्रसिद्ध वाळू माफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याने ही धमकी दिली. याशिवाय पिंटू पाटील याने सोलापूर शहरातील शिवसेना कार्यालय देखील जाळून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५१ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.