अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे

मंत्री धनंजय मुंडे यांचा माैठा गाैप्यस्फोट, खळबळजनक वक्तव्य करत म्हणाले पाया पडतो…

शिर्डी – राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून बीडचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. बीडमधील मागील काही आठवड्यांमधील घाडमोडींच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद नाकारण्यात आले आहे. पण आज धनंजय मुंडे या सर्व घडामोडीनंतर मुंडे यांनी भाजपाबद्दल भाष्य केले आहे.

धनंजय मुंडेंनी प्रकृतीचं कारण देत शनिवारी पक्षाच्या नवसंकल्प शिबिराला अनुपस्थित होते. मात्र आज अचानक त्यांनी शिर्डी गाठत अधिवेशनाला हजेरी लावली. धनंजय मुंडे यांना त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांविषयी सुद्धा विचारणा करण्यात आली. याबाबत ते म्हणाले की, वाल्मीक कराड याच्यावरून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून वेळ आली की याबाबतची सर्व उत्तर देईल, असे आता मंत्री धनंजय मुंडेंनी सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य केले आहे ते म्हणाले “पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे. पाया पडलो पण दादा म्हणाले, काही होत नाही. सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत. तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरु झालं,” असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. २०१९ साली पहाटेचा शपथविधी पार पडला होता. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. पण हे सरकार अवघे ८० तास चालले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. दरम्यान या दाव्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

माझ्यावर चुकीचे आरोप करून मला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला. मला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला, तरी ते शक्य होणार नाही. कारण मी अर्जुन आहे. चक्रव्यूह भेदण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, असेही मुंडे म्हणाले आहेत.