‘मला मुख्यमंत्री होण्याचे कोणतेही स्वप्न किंवा लालसा उरली नाही’ – देवेंद्र फडणवीस

 भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते मुख्यमंत्रीपदासाठी आसुसलेले असल्याची नेहमीच टीका केली जाते. पण आता खुद्द फडणवीस यांनीच आपल्याला आता या पदाची कोणतीही लालसा राहिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.सद्यस्थितीत माझ्या मनात मुख्यमंत्री होण्याचे कोणतेही स्वप्न किंवा लालसा उरली नाही. पक्ष देईल ती जबाबदारी मी नेटाने सांभाळेन, असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

फडणवीसांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, मी सलग ५ वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ २ मुख्यमंत्र्यांनाच ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला.त्यापैकी एक वसंतराव नाईक व दुसरा मी. त्यामुळे आता माझ्या मनात मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न किंवा लालसा काहीही उरले नाही. महायुती ज्याच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करेन, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन.देवेंद्र फडणवीस यांना यावेळी तु्म्हाला भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होणे आवडेल का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य करणे टाळले. राजकारणात अशा चर्चा नेहमीच होत असतात. त्यामुळे त्याची उत्तरे द्यायची नसतात.आर्थिक क्षेत्रात काम करणे ही माझी आवड होती. वकिली करणे हे माझे स्वप्न होते. पण ते भंगले. त्यामुळे मी मागील २५ वर्षांपासून विधानसभेत राज्याच्या जनतेची वकिली करत आहे, असे फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीचे नेते माझ्यावर जाणिवपूर्वक टीका करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. भाजप हा सत्ताधारी महायुतीमधील ताकदवान पक्ष आहे. त्यामु्ळे महाविकास आघाडीचे नेते भाजपवर सर्वाधिक टीका करत आहेत.त्यातही त्यांच्या थिंक टँकने विशेषतः माझ्यावर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्ले करण्याचे, माझी प्रतिमा मलिन करण्याचे निर्देश दिलेत. माझ्यावर टीका केल्यामुळे भाजप व महायुतीची ताकद कमी होईल असे त्यांना वाटतो, असे फडणवीस या यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.