
निवडणूक आयोगाच्या त्या घोळावर राज ठाकरे संतापले, आयोगावर गंभीर आरोप करत ही मागणी, काय घडले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधीच निवडणूक आयोगाविरोधात विरोधक एकत्र आले आहे. महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने १५ ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. निवडणूक प्रक्रियेत असलेल्या त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी आज दुसऱ्यांदा राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरी शैलीत निवडणूक आयोगाचा समाचार घेतला. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेवेळी २०२४ च्या निवडणुकीतील एक किस्सा सांगितला. कांदीवली पूर्व मधील एका महिलेचं वय २३ वर्षे, तिच्या वडिलांचं नाव हे दीपक कदम त्यांचे वय ११७ वर्ष दाखवण्यात आलं आहे. चारकोपमधील नंदिनी चव्हाण यांच्या वडिलांचं वय १२४ वर्षे महेंद्र चव्हाण यांच्या वडिलांचं नाव ४३ वर्षे दाखवलं आहे. असं सांगत राज ठाकरे यांनी कोणी कोणाला काढलं आहे तेच कळत नाही असा खास ठाकरे शैलीत टोला लगावला. त्यानंतर सर्वजण हसू लागले. पण परत गंभीर विषय असल्याचे सांगत आणखी एक कोपरखळी मारली. निवडणूक आयोय निवडणूक घेते तर राजकीय पक्ष निवडणुक लढवतात. याच राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मतदार याद्याच दाखविणार नसेल तर घोळ आहे, असा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
निवडणूक आयोग सरकारची कठपुतली बनवून काम न करण्याचा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मागील सर्व निवडणुका रद्द करण्याची मागणी माविआच्या नेत्यांनी केली आहे. या बैठकीत प्रथमच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच टेबलावर आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे केवळ राजकीयच नाही तर प्रशासकीय वर्तुळातही या चर्चा सुरू झाली आहे.









