एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नाही?मग या अडचणी येणार

नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना आरटीओचा इशारा, या सेवा होणार बंद, या तारखेनंतर मुदतवाढही नाही

पुणे – वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविणे आवश्यक आहे. आता सरकारकडून या बाबत एक सुचना देण्यात आली आहे.

एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी या मुदतीत नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एचएसआरपी नंबरप्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्यावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर भविष्यात दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात कुठेही एका ठिकाणी २५ किंवा २५ पेक्षा जास्त दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक मालकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी अर्ज केल्यास त्यांच्या सोईच्या ठिकाणी किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये संबंधित एजन्सी मार्फत कोणतेही अतिरीक्त शुल्क न आकारता एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यात येईल, असेही आरटिऒ मार्फत जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे परिवहन विभागाने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही तिसऱ्यांदा दिली गेलेली मुदतवाढ असून, यानंतर कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. एचएसआरपी नंबर प्लेट न लावलेल्या कोणत्याही जुन्या वाहनांची नूतनीकरणाशिवाय कोणतीही कामे करू नका, असे आदेश परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना दिले आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना एचएसआरपी लावणे न्यायालयाने बंधनकारक केले आहे. या निर्णयानुसार पुणे शहरात सुमारे २६ लाख वाहनांवर ही सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. परंतु, आजअखेर फक्त ६ लाख वाहनधारकांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित वाहनधारकांनी अद्याप याकडे दुर्लक्ष केले आहे.