मे नंतर आता जून महिन्यात किती पाऊस पडणार?

हवामान खात्याकडून समोर आली महत्वाची माहिती, काय असेल स्थिती, पाऊस झोडपणार का गायब होणार?

मुंबई – महाराष्ट्रात वेळेपुर्वी आलेला मान्सून आणि त्याच्या आधी आलेला अवकाळी पाऊस यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पुर आला तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. आता जुनमधील पाऊस आणि स्थिती याबाबत माहिती समोर आली आहे.

जुन महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे, तर उत्तर-पश्चिम भारतात सरासरी आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याचे महानिदेशक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि आसपासच्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या मान्सूनच्या कोअर झोनमध्ये लॉन्ग पीरियड एव्हरेजच्या १०६ टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल. हे क्षेत्र शेतीसाठी नैऋत्य मान्सूनवर अवलंबून आहे. हवामान खात्याने एप्रिलमध्ये सांगितले की, २०२५ मध्ये अल निनोची शक्यता नाही, त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. २०२३ मध्ये अल निनोमुळे ६ टक्के कमी पाऊस पडला होता. अल निनोमुळे समुद्राचे तापमान ३-४ अंश वाढते, ज्यामुळे कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त आणि जास्त पावसाच्या क्षेत्रात कमी पाऊस पडतो. ला निना उलट परिणाम करते, ज्यामुळे चांगला पाऊस होतो. अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीतील वाढलेली आर्द्रता, समुद्राचे जास्त तापमान, पश्चिमी वारे आणि चक्रीवादळांमुळे यंदा मान्सून लवकर आला. दरम्यान महाराष्ट्रात जून महिन्यात सरासरीपेक्षा १०५% अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खास करून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यंदा २४ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला, जो नेहमीच्या १ जूनच्या तारखेपेक्षा ८ दिवस लवकर आहे. गेल्या १६ वर्षांत प्रथमच इतक्या लवकर मान्सून आला. २००९ मध्ये तो ९ दिवस लवकर आला होता, तर १९७२ मध्ये १८ जूनला सर्वात उशिरा दाखल झाला होता.