दारूसाठी पतीचे भयंकर कृत्य ; पत्नीवर धारदार कोयत्याने वार करून केले गंभीर जखमी

पुणे – पुण्यातील येरवडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर धारदार काेयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी पतीवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पती बंडू हरीशचंद्र कांबळे (वय-४६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे दाम्पत्य येरवडा परिसरात लक्ष्मीनगर परिसरात राहण्यास आहे. पती बंडू कांबळे हा पत्नीचे चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी सतत वाद घालत हाेता.

१ सप्टेंबर राेजी पती बंडू कांबळे याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडणे करत तिला शिवीगाळ केली. त्यानंतर मला दारुसाठी पैसे देणार नाहीस, थांब तुला आता कायमची संपवूनच टाकताे, तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून त्याने पत्नीच्या डाेक्यावर धारदार काेयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.