
जपानला मागे टाकत केला विक्रम, आता समोर फक्त हेच देश, तीन वर्षात तिसरे स्थान मिळणार?

मुंबई – भारताने आज एक अनोखा टप्पा सर केला आहे. भारताने जपानला मागे टाकत जगातील चाैथी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. आता भारतीय अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाली आहे. नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली आहे.

नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या १० व्या बैठकीनंतर ते म्हणाले, ‘जागतिक आणि आर्थिक वातावरण देशासाठी अनुकूल आहे. आता आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. आता आपण ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनलो आहोत. सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की, आता भारतीय अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाली आहे. आपण हा टप्पा गाठून इतिहास रचला आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांच्या अर्थव्यवस्था आपल्या देशाच्या पुढे आहेत. जर आपण आपल्या योजना आणि विचारांवर ठाम राहिलो तर अडीच ते तीन वर्षांत म्हणजेच ३० ते ३६ महिन्यांत आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. IMF च्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक – एप्रिल २०२५’ च्या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारताची नाममात्र जीडीपी ४,१८७.०१७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, तर जपानची जीडीपी ४,१८६.४३१ अब्ज डॉलर असण्याचा अंदाज आहे. यावरून स्पष्ट होते की भारताने जपानला नुकतेच मागे टाकले आहे. येत्या काही वर्षांत भारत जर्मनीलाही मागे टाकून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. २०२७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडेल, आणि या वेळी जीडीपीचा आकार ५,०६९.४७ अब्ज डॉलर असेल. २०२८ पर्यंत भारताची जीडीपी ५,५८४.४७६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर त्याचवेळी जर्मनीची जीडीपी ५,२५१.९२८ अब्ज डॉलर असण्याची शक्यता आहे. २०२५ मध्ये अमेरिका ३०,५०७.२१७ अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था राहील, आणि चीन दुसऱ्या स्थानावर १९,२३१.७०५ अब्ज डॉलरसह राहणार आहे. सध्या भारतामध्ये वार्षिक जीडीपी वाढ दर सुमारे ६.५% ते ७.२% दरम्यान आहे. थेट विदेशी गुंतवणूक वाढत असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील उपस्थिती वाढली आहे. दरम्यान अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगात अशांतता असताना भारताने हे स्थान मिळवले आहे, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील भारताच्या वाढीला रोखू शकलेले नाहीत.
भारताची अर्थव्यवस्था सध्या अतिशय वेगाने वाढत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार यावर्षात भारतीय अर्थव्यवस्था चीनच नाही तर अमेरिका आणि युरोपलाही मागे टाकील. या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर राहील असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.









