राज्यातील या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झोडपून काढणार

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, अनेक जिल्ह्यांना अलर्ट, हवामान खात्याचा महत्वाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

मुंबई – जुलै महिना संपत आला असताना पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूराची स्थिती निर्माण झाली आहे. आता राज्याला पुन्हा एकदा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आपातकालीन यंत्रणा सतर्क झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही भागांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, पुणे विभागातील घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार असल्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, बीड, अकोला, जालना, यवतमाळ, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. घाट भागांत विशेषतः ताम्हिणी घाटात २४ तासांत २८० मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद आहे. महाबळेश्वरमध्ये २०२ मिमी, कोयना १८८ मिमी आणि लोणावळा १५१ मिमी इतकी पाऊस नोंदवली गेली. या पावसामुळे खडकवासला व ताम्हिणी परिसरात धरण साठा जवळपास पूर्ण भरला असून नदी किनारी भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने शेतीत कामांना वेग आला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एकंदरित, आज दिवसभर राज्यातील अनेक भागांत पावसाळी वातावरण राहणार असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागानुसार पुढील दोन दिवस पावसाचा जोर काही भागांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा असून कोकणातही जोरदार सरी कोसळतील. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा दिला आहे.