
राज्यातील इतक्या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट, आपत्कालीन कक्ष सज्ज, अंदाज घेऊनच घराबाहेर पडा!

मुंबई – अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे . राज्यात आजपासून म्हणजे ६ ते ९ जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे . त्यामुळे सतर्कतेचा इशाराही दिला आहे.

हवामान खात्याने ६ ते ९ जुलै या काळात महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिम बंगाल व आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्याच्या पावसाची हजेरी राहणार आहे . यावेळी वारे देखील वाहणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हाय अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात क्षीण झालेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याला रविवारी आणि सोमवारी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुमारे २०० मिमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्यातील ९ जिल्ह्यांसाठी मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट, तर १९ जिल्ह्यांसाठी मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाला असून, राज्यातील विविध भागांत मुसळधारेचा अंदाज मात्र कमी-जास्त प्रमाणात आहे. महाराष्ट्रात यंदा जुलैमध्ये बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.









