मुसळधार पावसामुळे राज्यातील मोठी धरणे काठोकाठ भरली

ही धरणे शंभर टक्के फुल, काही धरणात ८० ते ९० टक्के पाणीसाठा, कोणती धरणे भरली? इशारा काय?

मुंबई – मागील दोन-तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातल्या धरणातील पाणीसाठय़ात लक्षणीय वाढ झाली असून बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातल्या सर्व धरणांतील पाणीसाठा 78.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यापुढील पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

आज १९ ऑगस्टपर्यंत राज्यातील आढळा, सीना, पांझरा, उजनी, राधानगरी, तुलसी, विहार, चासकमान, बारावे, भाटघर, पेन ही धरणं १०० टक्के भरली आहेत. तर बहुतांश धरणे ९० टक्क्यांच्यावर भरली आहेत. शुक्रवारपासून कमी अधिक सुरू असलेल्या पावसामध्ये कालपासून वाढ झाली. यामुळे ओढे नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर पश्चिम घाट परिसरातही मुसळधार पाउस होत आहे. यामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. जायकवाडी धरण एकूण ९६.१४ टक्के, उजनी धरण एकूण १०२.१८ टक्के, कोयना धरण ९३.६४ टक्के, अलमट्टी धरण ९१.१६ टक्के, मोडक सागर धरण ९१.७४ टक्के, तानसा धरण ९९.२६ टक्के, म.वैता ९७.५१ टक्के, भातसा धरण ९३.०० टक्के, हेटवणे धरण ९७.३४ टक्के, पानशेत धरण ९६.७६ टक्के, खडकवासला धरण ६६.८४ टक्के, मुळशी धरण ९३.४८ टक्के, गंगापूर धरण ८४.७८ टक्के, दारणा धरण ८५.९३ टक्के, करंजवण धरण ९२.३७ टक्के, गिरणा धरण ६९.९३ टक्के पाणीसाठा आहे. पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी काही भागांत शेती पाण्याखाली गेल्याने नुकसानही झाले आहे. मात्र, एकंदरीत पाहता पाण्याची टंचाई मिटल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जवळपास सर्व धरणातून पाणी सोडले असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

जून आणि जुलै महिन्यात आनियमित पडणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्याची चिंता व्यक्त केली जात होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा जोर धरल्याने तसेच गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणे भरली आहेत.