पुढील काही तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे, राज्यात शेतीचे प्रचंड नुकसान, शाळा, कार्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबई – मुंबईसह, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यासह विदर्भातही आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगडसह मुंबई-ठाण्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
आज संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, आज ठाणे, मुंबई, रायगड, पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर व नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. विदर्भात आज पासून पुढील तीन दिवस तूरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज दिला त्यानुसार, आज पुण्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी खूप जोरदार ते मुसळधार तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या सर्व विभागांत गेल्या ४८ तासांपासून जोरदार पाऊस कोसळत असून पावसामुळे किमान आठ जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत बचाव पथकांनी ३०० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यभरात साडेचार लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. विदर्भात २ लाख हेक्टर तर मराठवाड्याच्या नांदेड, बीड जिल्ह्यांत २ लाख ५९ हजार हेक्टर पिकांचे पावसाने नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रामुख्याने तूर, कापूस, सोयाबीन पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल, आपत्कालीन व पोलीस यंत्रणेला सतर्कतेचे आणि मदतकार्यात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिकेच्या कार्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.